DgYugandhara लेखः संपूर्ण भारतभूमीतील स्वातंत्र्यप्रेमी जनतेसाठी, धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी आणि परकीय सत्तांशी दोन हात करणाऱ्या पराक्रमी वीरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जन्माने महाराष्ट्राच्या मातीला एका तेजस्वी युगपुरुषाचा लाभ झाला, ज्याने संपूर्ण हिंदुस्थानात स्वराज्याचा अखंड नाद घुमवला.
शिवचरित्राचा प्रारंभ आणि स्वराज्यनिर्मिती
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर जन्मलेला हा बालवीर जन्मतःच तेजस्वी व विलक्षण कर्तृत्ववान होता. त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेबांनी त्यांच्यावर रामायण, महाभारत आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार केले. याच ध्येयदर्शनातून त्यांनी स्वराज्याची संकल्पना रुजवली. दादाजी कोंडदेव सारखे युध्द कौशल्य व तलवारबाजीचे शिक्षण देणारे गुरु लाभले तर रामदासस्वामींंकडून देव, देश आणि धर्माचे रक्षणासाठी अध्यात्म आणि धारणेची जोड त्यांना मिळाली.
देव, देश आणि धर्म यांनी प्रेरित झालेल्या राजांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेच्या कार्यास आरंभ केला. एकामागून एक गड सर करत त्यांनी मराठ्यांचे ध्येय दृढ केले. "राज्य कोणाचेही असो, ते लोकहितवादी असावे" या विचारसरणीवर त्यांनी आधारलेले स्वतंत्र 'स्वराज्य' उभे केले.
युद्धनीती आणि शौर्यसंपन्न पराक्रम
शिवाजी महाराज हे केवळ योद्धेच नव्हे, तर अभूतपूर्व रणनितीकार होते. त्यांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा प्रभावी उपयोग करून मुघल, आदिलशाही आणि इंग्रज यांना वेळोवेळी धूळ चारली. अफजलखानासारख्या बलाढ्य सरदाराचा वध करणे, शाइस्तेखानाच्या छावणीत थेट शिरकाव करून त्याचे बोटे तोडणे आणि आग्र्याच्या बंदिस्त कैदेतून चातुर्याने सुटका करणे या त्यांच्या पराक्रमाच्या अद्वितीय कहाण्या आजही प्रेरणा देतात.
विशेषतः १६७४ मध्ये रायगडावर भव्य आणि वैभवशाली पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्याने हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली आणि मराठ्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची घोषणा झाली.
शिवाजी महाराजांचे प्रशासन आणि लोककल्याणकारी धोरण
शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी राजेच नव्हे, तर अत्यंत दूरदृष्टी असलेले शासक होते. त्यांनी लोककल्याणकारी धोरण राबवून आपल्या प्रजेचे कल्याण साधले. त्या काळातील प्रस्थापित संस्थानीक दसपटकर शिंदे यांचे सोबत सलोका साधून, शिंदेच्या अखत्यारीत असलेलल्या दाभोळ बंदरावर मराठा आरमाराची स्थापना करून, मराठ्यांची समुद्रसत्ता प्रबळ केली. त्यांनी कष्टकरी, शेतकरी, व्यापारी आणि सैनिक यांना न्याय देणारे धोरण राबवले. त्यांच्या कारभारात जात-पात, धर्मभेद नव्हता; सर्वांना समान न्याय मिळत असे.
शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी उत्तरायुष्य
शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यभर स्वराज्यसंकल्पनेवर निष्ठा ठेवली. त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावरच नव्हे, तर धोरणी बुद्धीच्या जोरावरही स्वराज्याची पताका फडकवली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांच्यासोबत अत्यंत शहाणपणाने संबंध ठेवले आणि स्वराज्यासाठी आवश्यक असलेली सामाजीक नीती राबवली.
६ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराज महासमाधिस्थ झाले, पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा धगधगता तेजोदीप आजही स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या प्रत्येकाच्या मनात उजळलेला आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊनच मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध निर्णायक संघर्ष केला आणि अखेर हिंदुस्थानात मराठ्यांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले.
शिवरायांचे अजरामर स्मरण
आजही, महाराष्ट्राच्या कणाकणात शिवरायांचे तेज आहे. त्यांच्या युद्धनीती, प्रशासनकौशल्य आणि पराक्रमाच्या गाथा सांगणारी प्रत्येक पिढी त्यांना अभिवादन करत राहील. शिवजयंती म्हणजे केवळ एक उत्सव नसून, स्वाभिमानाचा जागर आहे. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करणे, हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. डिजीयुगंधरा द्वारा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुण्य स्म्रुतीस अभिवादन आणि महाराष्ट्राच्या व देशाच्या समस्त जनतेला शिवजयंती निमीत्त शुभेच्छा..! Published by DgYugandhara.
जय भवानी! जय शिवाजी!
If you have any query, please let me know.