मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा ०७ ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

योद्धा कर्मयोगी

डिजीयुगंधरा प्रकाशितः डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे ०७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी 0५:00 वाजता राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये होणार प्रकाशन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर राहणार उपस्थित

कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशन समारंभाचे आयोजन.

फ्रि ट्रायल करीता इथे Click करा.

 डिजीयुगंधरा प्रकाशीत ठाणे (शनिवार, ०३ ऑगस्ट २०२४) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी, ०७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये ०७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. शनिवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजन समितीच्या वतीने प्रकाशन सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली.

या पत्रकार परिषदेस प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर, चरित्रग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी संबोधित केले. यावेळी अन्य मान्यवर व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले, तर विलास ठुसे यांनी आभार प्रदर्शन केले.

Amazon Prime करीता  Click करा.

योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या चरित्रग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास आम्ही जवळून पाहिला असून आज ते राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत, याचा त्यांचा सहकारी म्हणून आनंद आहे. त्यांच्यावरील चरित्रपर ग्रंथाचे प्रकाशन ठाण्यात होत असून हा सोहळा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तर या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे चोख नियोजन करण्यात आले असून हा सोहळा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न होईल, असे आमदार रवींद्र फाटक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी ‘योद्धा कर्मयोगी, एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथामागील, तसेच प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. डॉ. उदय निरगुडकर यावेळी म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील, विशेषत: त्यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाच्या घटना, प्रसंग सामान्य जनतेला माहीत आहेत. परंतु राज्याच्या मुख्यमंत्री पदाला गवसणी घालणारे त्यांच्यातील नेतृत्व घडले कसे, त्यामागील पार्श्वभूमी काय होती, याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्यातील नेतृत्वगुणांची जडणघडण कशी झाली, हे विविध घटना, प्रसंग आणि अनुभवी सहकाऱ्यांच्या मनोगतांतून उत्तमपणे मांडले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिला मोठा नागरी सत्कार ठाण्यात झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या मुख्यमंत्री पदावरील कारकिर्दीचा कळसाध्याय सुरू असताना त्यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथाचे प्रकाशन ठाण्यातच होत आहे याचा आनंद आहे, असे प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी यावेळी केले. तर ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी देखील याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. ग्रंथाली प्रकाशनाने आजवर अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्याच परंपरेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन ग्रंथालीमार्फत होत आहे, याचा आनंद आहे, अशी भावना सुदेश हिंगलासपूरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच यानिमित्ताने ग्रंथालीकडून ग्रंथखरेदीची अभिनव योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार केवळ ३५ हजार रुपयांमध्ये  ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या १०० प्रती आणि सोबत ग्रंथालीची विविध मान्यवर लेखकांची अन्य १०० पुस्तके असा एकूण २०० पुस्तकांचा संच देण्यात येईल. तसेच केवळ २० हजार रुपयांमध्ये ‘योद्धा कर्मयोगी’च्या ५० प्रती आणि सोबत ग्रंथालीची अन्य ५० पुस्तके असा एकूण १०० पुस्तकांचा संच देणारी दुसरी योजनाही जाहीर करत, ग्रंथदात्यांनी ही पुस्तके शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुदेश हिंगलासपूरकर यांनी याप्रसंगी केले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय, सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनातील संघर्षशील प्रवासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या या चरित्रग्रंथाचे लेखन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, समकालीन मंडळी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केला आहे. त्यासाठी डॉ. अरुंधती भालेराव, राजन शंकर बने, सान्वी ओक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय सात दशकांपूर्वी साताऱ्याहून मुंबईत आले, तिथून ते ठाणे येथे स्थायिक झाले. हा सारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. मात्र कष्टाच्या, निष्ठेच्या आणि सचोटीच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी विलक्षण झेप घेतली. या त्यांच्या वाटचालीतील विविध प्रसंग, घटना-घडामोडी यांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि नेतृत्वाची घडण कशी झाली, हे महाराष्ट्रीय जनांपुढे मांडण्याच्या प्रांजळ हेतूने ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ हे चरित्र शब्दबद्ध केल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ असणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा ऐतिहासिक असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत तो संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी आयोजन समितीने चोख नियोजन केले असून सुजाण ठाणेकरांच्या सहभागाने आणि सहकार्याने हा समारंभ यशस्वी होईल, असा विश्वास आयोजन समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.










एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)