मै अटल हूं... एक अप्रतिम चित्रपट.. (Review in Marathi)

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 

मै अटल हुँ.. अटलजी वाजपेयींंचा जिवन प्रवास. फिल्म आढावा, Review in Marathi सौजन्य: डॉ. उदयजी मुलगुंद.


Review by Dr. Uday Mulgund (डॉ.उदय ह.मुळगुंद. कृत आढावा) ,  DgYugandhara, डिजीयुगंधरा Film Review प्रकाशीत:       
 'मै अटल हूं' (Main Atal Hoon film) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. कालच चित्रपट पाहिला. सदर चित्रपट अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आहे. सत्तरच्या दशकात अटलजींना खूप जवळून पाहिले होते. गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण सांगली येथे आम्ही त्यांच्या हस्ते आयोजित केले होते. अनेकदा कार्यक्रमात त्यांचे दर्शन व्हायचे त्यांची कित्येक भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. प.पू गुरुजी यांच्या जीवनावर त्यांनी केलेले भाषण आजही शब्दशः लक्षात आहे. प.पू.गुरुजींचे ते मानसपुत्र होते. रा.स्व.संघाचे स्वयंसेवक व प्रचारक म्हणून ते कसे असतील याची कल्पना नव्हती या चित्रपटात स्वयंसेवक म्हणून अटलजी कसे होते याची झलक पहायला मिळते, त्यामुळे  चित्रपट व तोही अटलजींच्या जीवनावर म्हणजे मोठे आव्हान होते असे म्हणायला हरकत नाही.


'मैं अटल हूं' (Main Atal Hoon Film) या चित्रपटात अटलजींच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एक व्यक्ती म्हणून, एक कवी म्हणून, एक मित्र म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचे इतरांशी असलेले संबंध दाखवण्यात आले आहेत.


वाजपेयी यांचा जीवनप्रवास या सिनेमातून उत्तमपणे उलगडतो. अटलजींची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी अप्रतिमपणे साकारली आहे. त्यांच्या बोलण्याची पद्धत, हातवारे, मध्येच पॉज घेणे हे विलक्षणरित्या दाखविले आहे क्षणभर आपण अटलजींनाच पहात आहोत अशी वातावरणनिर्मिती केली आहे.


आजच्या पिढीला अटल यांच्या राजकीय कारकीर्दीविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी एक अनमोल खजिना ठरु शकतो. पण ज्यांना त्यांच्याविषयी माहिती आहे त्यांनाही हा चित्रपट निश्चितपणे आवडेल. चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा ही अटलजींच्या जीवनातील विविध प्रसंग दाखविताना अटलजींच्या  जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात यशस्वी झाली आहे. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या माध्यमातून अटलजींची  कहाणी सरळ मार्गाने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटला नाही. उगाच खेचून ताणून चित्रपटात काही सीन टाकण्यात आल्याचे कधीही वाटले नाही. काही ठिकाणी कथा भावनिक मोड घेते तर काही ठिकाणी अधिक रंजक होताना दिसते. २ तास २० मिनिटे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात पंकज त्रिपाठी यांच्यातील अभिनेता यशस्वी झाला आहे या भूमिकेसाठी त्यानी प्रचंड मेहनत केली असल्याचे लक्षात येते.


पंकज त्रिपाठी हे या चित्रपटाचा प्राण आहेत. अटलजींची भूमिका साकारणे अतिशय आव्हानात्मक असतानाही पंकज त्रिपाठीनी ही जबाबादारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. अटलजींची कविता असो वा भाषण,  पंकज त्रिपाठी भूमिका जीवंत करताना दिसतात, पीयूष मिश्रा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वडिलांची भूमिका योग्य पद्धतीने साकारली आहे.


चित्रपटात लालकृष्ण अडवाणी, नेहरू, प्रमोद महाजन, अरुण जेटली, सुषमा स्वराज, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, जेठमलानी, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, इंदिरा गांधी, नवाज शरीफ यांच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांनी आपले योगदान आकर्षकरित्या दिल्याने चित्रपटाची कथा पुढे नेण्यात दिग्दर्शकाला चांगले यश मिळाले आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक 'रवी जाधव' यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. यापुर्वीच पंकज त्रिपाठी यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) चा पदवीधर असलेला हा अभिनेता बॉक्स ऑफिस आणि ऑफ-बीट सिनेमांमध्ये समतोल राखण्यात यशस्वी झालाय.


अटलजींची अविस्मरणीय भूमिका करुन पंकज त्रिपाठींनी स्वत:ला अशा जागी नेऊन ठेवलंय ज्यामुळे प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला त्यांच्यासोबत काम करावसं वाटेल.

प्रत्येक राष्ट्रप्रेमी व्यक्तीने हा चित्रपट आवर्जून पहावा.

Main Atal Hoon Film Review by Dr. Uday Mulgund (डॉ.उदय ह.मुळगुंद.)

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)