उठ दसपटकर उठ, जागा हो..! घे गरुड झेप पुनः - भाग ५

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0

 



उठ दसपटकर उठ.. जागा हो..!


DgYugandhara, डिजीयुगंधरा संपादकीय: गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोथट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं. आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य,  जगणं असह्य होऊन जातं. पण गरूडाचं जिगर वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.


त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा तो गरूड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.


आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.


स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, परिवर्तनासाठी वेदना सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा). एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले आणि वाटलं     हा गुण आपल्या जनमानसांत   पुनः जाग्रुत झाला तर??  मग आपली माणसं दात काढलेल्या सापासारखी सरपटत तरी बसणार नाहीत. एक मेकाचे पाय खेचत बसणार नाहीत. एकमेकांच्या तंगड्यात तंगडी घालून तो पडतोय का, याची वाट बघत वेळ फुकट घालवणार नाहीत. आणि आपलं सगळ सोडून दुस-याच्या स्वाधीन करून, पराधीन होणार नाहीत. जे आज आपल्या दसपटी विभागात पक्षीय निष्ठेत गमावून बसलेले आणि आपली नितीमुल्य आयारामांच्या स्वाधीन करून, त्यांच्या हुकमाची तामील करणारे पराधीन आपले कारभारी, महान पुर्वजांच्या गरुड झेपेचं विस्मरण झालेले आपले समाज बांधव आणि भुमीपुत्र, आपल्या या लोकानी हे जानलं पाहिजे की,  नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून मुलायम मोरपीस फिरणार नाही, तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल. अन्यथा पुढची आपली पिढी   देखील, पक्षीय निष्ठेत आपला इतिहास विसरून त्यांचेच अनुकरण करतील जे आज आपले चंग कारभारी, तथाकथीत पुढारी करीत आले आहेत.


परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे आता आपल्या लोकांनी समजलं पाहिजे आणि म्हणून रडतोस काय दसपटकरा, (येथील समस्त भुमीपुत्र) बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन. नवनिर्मितीचं बीजं, जी तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आयारामांच्या लाचारीनं बोथट झालेली नखं; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाची लख्तरं आणि पुन्हा आपल्या महान पुर्वजांच अनुकरन कर. आठव त्या तुझ्या महान पुर्वजांना देवी रामवरदायिणीने दिलेलं वरदान आणि कर अंत त्या उर्मट, क्रुतघ्न, नौटंकी धनानंदांचा आणि होऊदे राज्याभिषेक तुमच्यातल्याच एकाद्या चंद्रगुप्ताचा पुनः. भुमीपुत्रांच्या न्यायहक्कासाठी, व्यसनमुक्त दसपटीसाठी, भ्रष्ट झालेल्या यंत्रनेला समुळ उखडण्यासाठी, अस्तनीत धुमसणा-या निखा-यांना विजविण्यासाठी, अखंड दसपटी एक होऊन तीच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रक्रुतीच्या परिवर्तनात या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. पराधीनतेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर, सह्याद्रीच्या पायथ्यावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला. उठ दसपटकरा उठ, जागा हो..! DgYugandhara द्वारा प्रकाशीत.

Post a Comment

0Comments

If you have any query, please let me know.

Post a Comment (0)