'कणीस' करतंय हेल्थचा भुगा ?? तुमच्या आवडत्या “कॉर्न” मुळे, शरीरावर होणारे 'महाभयंकर' दुष्परिणाम जाणून घ्या.. Fitness Funda - 1

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
1

 

DgYugandhara Fittness Funda: :ही घटना अमेरिकेतली आहे पण, आपल्या सर्वांना बरंच काही शिकवणारी आहे.  घटना कोणे एके काळची नाही, फक्त १० वर्षांपूर्वी घडलेली. कॉलेजचं शिक्षण संपवून पुढील आयुष्याची सोनेरी स्वप्ने बघणाऱ्या, इयान चीनी आणि कर्टीस एलिस ह्या दोन युवकांच्या कानावर बातमी येते की, “त्यांची पिढी ही अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव अशी पिढी असणार आहे की, ज्यांचे आयुष्यमान, त्यांच्या आईवडीलांपेक्षा कमी असेल आणि याचे कारण, ते खात असलेल्या आहारात दडलेले आहे. अस्वस्थ झालेली ही मुलं, ह्या बातमीतील सत्यता जाणून घेण्यासाठी, एका शास्रज्ञाकडे जातात. ते शास्रज्ञ, त्या दोघांच्या केसांचे सॅम्पल तपासून सांगतात की, त्यांचे केस मक्यापासून बनलेले आहेत. त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते.  ते म्हणतात आम्ही कुठं एवढा मका खातो, त्यानंतर ते त्यांच्या केसात हा मका आला कुठून ??  याचा शोध घ्यायला सुरुवात करतात. त्यासाठी, ते स्वतःच्या एक एकर शेतात, मका उगवायचे ठरवतात. त्यांच्या या शोधयात्रेवर आधारित डॉक्युमेंट्री म्हणजे, “किंग कॉर्न” सुमारे सव्वा तासाची ही डॉक्युमेंट्री, आपल्याला कोपरखळ्या मारत हसवते, टोकदार प्रश्न विचारते आणि शेवटी विचार करून सोडते.  २००७ मध्ये आलेल्या या डॉक्युमेंट्रीने अमेरिकेत खळबळ उडवून दिली. पुढील गोष्ट जाणून घेण्यासाठी, प्रत्येकानें ही डॉक्युमेंट्री मुद्दाम, प्रत्यक्ष पहावी. यु-ट्यूब वर आहे  आता तुम्ही म्हणाल की, अमेरिकतल्या या गोष्टीचा आपल्याशी काय संबंध ..??

DgYgandhara कडील उपलब्ध        माहितीनुसार थोडी आकडेवारी बघू .. मका पिकवणाऱ्या देशांत, भारत जगात दहाव्या क्रमांकावर आहे.  गेल्या दशकात मका भारतातील तांदूळ आणि गव्हानंतर, तिसऱ्या क्रमांकाचे पीक आहे. लक्षात घ्या, की आपल्या ज्वारी आणि बाजरीचे उत्पादन मक्यापेक्षा कमी आहे. लवकरच मका हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक बनेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात मक्याचे उत्पादन इतर कोणत्याही धान्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर कधीतरी पावसाळ्यात भुट्टा (कणीस) खातो त्यापलीकडे, आमचा आणि मक्याचा संबध काय ..??

भारतात पिकवल्या जाणाऱ्या मक्यापैकी ४९% मका, कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी वापरला जातो. १२ % पशुखाद्य बनवण्यासाठी, १३ % स्टार्च बनवण्यासाठी आणि २५ % खाण्यासाठी, मकाच वापरला जातो. अगदी ‘प्रोसेस्ड फूड’ बनवण्यासाठी बहुतांश वेळा, मकाच वापरला जातो. आपण फक्त 'कधीतरी' मका खातो, असं वाटणाऱ्यांनी खालील यादी जरा नीट बघावी. बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न सूप, मक्याचे पॅटिस, कॉर्न फ्लेक्स, मसाला कॉर्न, मक्के की रोटी, कॉर्न पुलाव, कॉर्न चीझ बॉल्स, कॉर्न चाट, कॉर्न सॅण्डवीच, कॉर्न कबाब, कॉर्न चीझ टोस्ट, कॉर्न शेझवान फ्राईड राईस, स्वीट कॉर्न खीर आणि लहानांपासून, मोठ्यांपर्यंत, सगळ्यांना आवडणारे पॉप कॉर्न. कोणत्याही छोट्या मोठ्या शहरांतील रेस्टॉरंट्सचे मेन्यू कार्ड बघा. तुम्हाला या डिशेस नक्कीच आढळतील. हल्लीची तरूण पिढी, आठवड्यातून किमान दोनदा तरी, यातलं काहीतरी नक्कीच खाते. आता, हे झालं मक्याचं दृश्य रूप.

शरीरात जाणाऱ्या मक्याच्या अदृश्य रूपाविषयी ऐकलं तर, तुम्हाला मक्याचे खरे ‘विश्वरूपदर्शन’ घडेल. घरोघरी रोज खाल्ले जाणारे ब्रेड, बिस्किट्स, कुकीज, केक, टोमॅटो सॉस, रेडी टु इट सूप्स, लहान मुलांचे आवडते जॅम्स, जेलीज्, न्युट्रीशन बार, आईसक्रिम, फ्लेवर्ड योगर्ट्स्, सॅलाड ड्रेसिंग, पिझ्झा बेस या सर्वांमध्ये कॉर्न फ्लोअर (मक्याचे पीठ) किंवा हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर (HFCS) (मक्यापासून बनवलेली साखर) असते. एरीएटेड कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, 'हेल्दी' म्हणून प्यायले जाणारे पॅकबंद नॅचरल फळांचे रस, या सर्वांत स्वीटनर म्हणून साखरेऐवजी, हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर (HFCS) वापरले जाते. गेल्या ३० वर्षांत, अमेरिकेतल्या लोकांचे साखर खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे, आणि त्याची जागा, HFCS ने घेतली आहे. तरीसुद्धा, अमेरिकेत गेल्या ३० वर्षात लठ्ठपणा, डायबेटीस, हृदयरोग, लिव्हरचे रोग यांचे प्रमाण खूपच वाढत आहे. अनेक शास्रज्ञांच्या मते याचे कारण HFCS आहे. खरी गोष्ट ही आहे की HFCS हे साखरेपेक्षाही अधिक घातक आहे. तरीही फूड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात HFCS वापरते कारण, ते साखरेपेक्षा स्वस्त आहे. HFCS मध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या फ्रुक्टोज मुळे, पोट पूर्ण भरले नाही अशी भावना निर्माण होते त्यामुळे अधिक खाल्ले जाते .. त्यातून चरबी आणि डायबेटीस वाढतो. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात गेलेले फ्रुक्टोज वापरले गेले नाही तर त्यामुळे फॅटी लिव्हर निर्माण होते. काही शास्रज्ञांच्या मतें, अधिक HFCS खाल्ल्याने पॅनक्रियाचा कॅन्सर होतो.  म्हणूनच अमेरिकेत आता ठराविक प्रमाणातच HFCS खावे असा प्रचार केला जातो आहे. मुळात ब्रेकफास्ट ही संकल्पना भारतीय नाही. आयुर्वेदांत, थंडीचे दिवस वगळता, इतर ऋतूत न्याहारीचा आग्रह धरलेला नाही. साधारण ९० च्या दशकापासून आपल्याकडे, हेल्दी ब्रेकफास्टच्या नावाखाली कॉर्न फ्लेक्सचा प्रचार सुरु झाला. मुळात अमेरिकेत मका, गाय आणि डुकरांचे वजन लवकर वाढावे म्हणून खायला देण्यात येतो. जो मका खाऊन डुकराचे वजन वाढते तो खाऊन माणसांचे वजन कसे कमी होईल.  पण, टी.व्ही.वर एखाद्या हिरॉईनने जाहिरात केली की, आपण लगेच त्याच्यावर उड्या टाकतो. कॉर्न फ्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात HFCS असते.  एखादा पदार्थ खाल्ल्यानें, रक्तातील साखर किती वाढते, हे ठरवणाऱ्या पद्धतीला “ग्लायसेमिक इंडेक्स” म्हणतात. तांदळाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' ६० आहे म्हणून भाताने डायबेटीस होतो असा प्रचार केला जातो, पण कॉर्न फ्लेक्सचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' तब्बल ८१ आहे.    तरीही तो 'हेल्दी ब्रेकफास्ट,  हे कसे शक्य आहे..?? शिवाय एक बाऊल कॉर्न फ्लेक्समध्ये, एक पॅकेट वेफर्सपेक्षाही जास्त मीठ असते. पुन्हा, कॉर्न फ्लेक्स दुधातून खाल्ले जातात. दुध आणि मीठ असलेला पदार्थ एकत्र खाऊ नये असे आपला आयुर्वेद कटाक्षानें सांगतो.

भारतात निर्माण होणाऱ्या मक्यापैकी, ४९ % मका कोंबड्यांचे खाद्य बनवण्यासाठी, तर १२ % पशुखाद्य बनवण्यासाठी वापरला जातो, हे आपण पाहिले. मक्यापासून बनवलेले पशुखाद्य खाल्ल्यानें, त्यांचे वजन लवकर वाढते व प्राण्यांमध्ये लठ्ठपणा निर्माण होतो. या लठ्ठपणामुळे हे प्राणी आजारी पडू नयेत म्हणून, त्यांना मोठ्या प्रमाणात अँँण्टिबायोटिक्स् द्यावी लागतात.  तरीही हे पशू जास्त काळ जगू शकत नाहीत म्हणून, त्यांना कोवळ्या वयातच मारून टाकले जाते. चरून गवत खाणाऱ्या गायीच्या रक्तांत १.५% सॅच्युरेटेड फॅट असते तर, मक्यापासून बनवलेले पशुखाद्य खाणाऱ्या गायीच्या रक्तांत, ९% सॅच्युरेटेड फॅट असते. अशा प्रकारें, मका खाऊन वाढलेल्या कोंबड्या आणि इतर पशुंचे मांस खाऊन आपली अवस्था काय होणार ..?? 

इतके घातक दुष्परिणाम पाहिल्यावर, आता आपण मक्यातील पोषणमुल्यांची चर्चा करू . १०० ग्रॅम मक्यातून ३४२ Kcal इतकी उर्जा, १० mg कॅल्शियम आणि २.३ mg आयर्न मिळते.त्याचवेळी १०० ग्रॅम ज्वारीतून ३४९ Kcal इतकी उर्जा २५ mg कॅल्शियम आणि ४.१ mg आयर्न मिळते.  तर १०० ग्रॅम बाजरीतून ३६१ Kcal इतकी उर्जा ४२ mg कॅल्शियम आणि ८ mg आयर्न मिळते. तर १०० ग्रॅम नाचणीतून तब्बल ३४४ mg म्हणजे मक्याच्या ३४ पट कॅल्शियम मिळते. याचा अर्थ, पोषणाच्या बाबतीत आपली देशी धान्यें, मक्याच्या कितीतरी पुढे आहेत. ही माहिती भारत सरकारच्या,“नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन, हैद्राबाद” च्या वेबसाईट वरून मिळवली आहे. याचा अर्थ, देशी धान्यांचे पोषणमुल्य सरकारला व्यवस्थित माहित आहे तरीही, अमेरिकेच्या मागे लागून मक्याची लागवड वाढवण्यामागे काय अर्थ ..?? 'बुद्धिमान माणसासाठी सर्व जग शिक्षक असते’ असे आपला आयुर्वेद सांगतो पण, कुणाकडून काय शिकायचे हे मात्र आपल्याला ठरवावे लागते. अमेरिकेकडून मक्याचा वसा घेण्याऐवजी, कोणताही प्रश्न मुळापासून समजावून घेण्याची वृत्ती, त्यासाठी अफाट मेहनत करण्याची तयारी हे गुण आपण स्विकारले तर, नक्कीच आपले भले होईल. नाहीतर एक दिवस हा मका, आपल्या शरीरातल्या पेशीं पेशीमध्ये जावून बसेल आणि “भुट्टा होगा तेरा बाप” अशी नवीन म्हण अस्तित्वात येईल. DgYugandhara प्रस्तूत.. Fitness Funda..








एक टिप्पणी भेजें

1टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें